राम मंदिराच्या परिसरात ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येण्याचे वृत्त विश्वस्त मंडळाने फेटाळले


नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष सध्या अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम येत्या ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. दरम्यान राम मंदिर उभारले जात असतानाच जमिनीखाली दोन हजार फूट ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त काल सर्वच माध्यमांमध्ये झळकले होते. पण राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर उभारले जाणार असून त्या ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी जमिनीखाली टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

तत्पूर्वी टाइम कॅप्सूल ठेवली जाणार असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनीच दिली होती. राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला भविष्यात मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्य सापडतील,असे त्यांनी म्हटले होते.