करिअरच्या अखेरच्या टप्प्यात वाईट वागणूक मिळाली, युवराजने व्यक्त केली नाराजी

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने भारताला एकहाती अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. 2007 चा टी20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप विजयामध्ये युवराज सिंहचा मोठा वाटा होता. एक वर्षापुर्वी युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती, मात्र आता त्याने आपले दुःख व्यक्त केले आहे. करिअरच्या अखेरच्या टप्प्यात बीसीसीआयने आपल्यासोबत अयोग्य व्यवहार केल्याचे, युवराजने म्हटले आहे.

युवराजने काही दिग्गज खेळाडूंची नावे घेतली, ज्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार असतानाही त्यांची निवृत्ती योग्यरित्या झाली नाही. युवराजने म्हटले की, मला वाटते की त्यांनी माझ्या करिअरच्या अखेरमध्ये जसा व्यवहार केला तो अयोग्य होता. मात्र मी जेव्हा काही महान खेळाडूंना बघतो, जसे की हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग, जहीर खान यांच्यासोबत देखील योग्य व्यवहार झालेला नाही. कारण हे भारतीय क्रिकेटचा भाग आहे. मी हे याआधी देखील बघितले आहे, त्यामुळे मी हैराण झालो नाही.

जो भारतासाठी दीर्घकाळ खेळतो, अवघड परिस्थितीमधून गेला आहे. त्याला तुम्ही निश्चितच सन्मान द्यायला हवा. जसे गौतम गंभीरने आपल्यासाठी दोन वर्ल्ड कप जिंकले. सेहवाग कसोटीमध्ये सुनील गावस्कर यांच्यानंतर सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू होता. व्हीव्हीएस लक्ष्मण, जहीर सारखे खेळाडू होते, त्यांना सन्मान मिळायला हवा, असे युवराजने म्हटले.

युवराजने म्हटले की, मला वाटत नाही की मी महान खेळाडू आहे. मी हा खेळ सन्मानपुर्वक खेळलो. मात्र मी जास्त कसोटी सामने खेळलो नाही. महान खेळाडू तो असतो ज्याचा टेस्ट रेकॉर्ड चांगला आहे.