सिरमच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनात ‘या’ समाजासाठी असणार स्पेशल कोटा?


मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनाच्या कामाला देशात सध्या वेगात सुरु असून या संशोधनामध्ये पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटचे नाव देखील चर्चेत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत हात मिळवणी करत सिरम या लसीचे उत्पादन करणार आहे. याच दरम्यान स्वदेश फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना उद्देशून ट्विट करत एक प्रश्न विचारला आहे आणि हाच प्रश्न सध्या सोशल मीडियात सध्या व्हायरल होत असून त्यावर जोरदार चर्चा होत आहे.

रॉनी स्क्रूवाल यांनी काहीशा विनोदी अंदाजात अदार पुनावाला यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी पारशी समाजासाठी तुम्ही काही खास राखीव लसी ठेवली आहे ना? असा प्रश्न विचारला. त्याला अदार यांनीही त्याच शैलीत उत्तर दिले. अदार यांनी प्रतिउत्तरात, हो तर… आपल्या समाजासाठी आपण पुरेसा साठा ठेवणार आहोत. आपल्या समाजाची संख्या पाहता एकाच दिवसात एवढ्या लसीचे उत्पादन करु की साऱ्या जगातील पारशी समाजातील लोकांचे कोरोनापासून संरक्षण होईल. मुळच्या पारशी समाजातील असणाऱ्या या दोन्ही प्रतिष्ठितांचा हा ट्विटरवरील संवाद काहीसा विनोदी अंगाने असला तरीही तो तितकाच आशावादीही ठरला, असे म्हणायला हरकत नाही.

पुण्यातील सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाद्वारा तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या चाचणीच्या पुढील टप्प्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) परवानगी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतचे विचारणा पत्रही डीसीजीआयकडे पाठवण्यात आले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सीईओपदी असणाऱ्या अदार पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार ते एस्ट्राजेनेकासह हातमिळवणी करत पुढील वर्षभरात कोरोनाविरोधातील या लसीचे उत्पादन थेट शंभर कोटींच्या घरात करणार आहेत. भारत आणि मध्यम मिळकतीच्या राष्ट्रांसाठी ही लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आतापर्यंत मिळालेले यश पाहता या वर्षाच्या अखेरील ही लस पूर्ण स्वरुपात विकसित होऊन पुढील वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांच्या आतच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता पूनावाला यांनी वर्तवली आहे.