मातोश्रीवर टीका करणाऱ्यांची अवस्था नारायण राणेंसारखी होते; चंद्रकांत पाटलांना इशारा


कोल्हापूर : शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांची अवस्था काय होते, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे आणि तिच गोष्ट चंद्रकांत पाटील यांनी ध्यानात ठेवावी, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला.

त्याचबरोबर युतीचा इतिहास चंद्रकांत पाटील यांना माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर टीका करताना थोडा विचार करावा, असे क्षीरसागर यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कामावर चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिली का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.

दरम्यान, सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर चंद्रकांत पाटील यांनी ताशेरे ओढले. राज्यात कोरोनाच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भाजपकडून त्यासाठी आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच आपल्यावर करण्यात येणाऱ्या वैयक्तिक टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. कोणावरही केलेले वक्तव्य खपवून घेतले जाऊ नये. कुणी चंपा म्हणते, कुणी कुत्रा म्हणते. त्यामुळे आता आक्रमक व्हावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.