गांधी परिवाराच्या कोरोना चाचणीची मागणी करणाऱ्या खासदाराला झाला कोरोना - Majha Paper

गांधी परिवाराच्या कोरोना चाचणीची मागणी करणाऱ्या खासदाराला झाला कोरोना


नवी दिल्ली – इटलीत कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही सरकारने कोरोना चाचणी करावी, अशी एनडीए घटकपक्षातील एका खासदाराने केली होती. पण त्याच खासदार महाशयांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

5 मार्चला ट्विट करत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी म्हटले होते की, कोरोना व्हायरसने इटलीला फार वाईट पद्धतीने विळखा घातला आहे. म्हणून मी सरकारला विनंती करतो की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.

काही दिवसांपूर्वीच इटलीतून गांधी कुटुंबीय परतले आहेत, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण आता हनुमान बेनिवाल यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बेनिवाल यांच्या या ट्विटरनंतर सोशल मीडियावरील वातावरण चांगलच तापले होते. त्यातच बेनिवाल यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे झाल्याने नेटीझन्स जुन्या ट्विटचा हवाला देत त्यांना ट्रोल करत आहेत.