प्रकाश आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना विपश्यना करण्याचा सल्ला


मुंबई: राज्यावर कोरानाचे दुष्ट संकट ओढावलेले असतानाच राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरु आहे. सरकार पाडण्याची आव्हाने सत्ताधाऱ्यांकडून दिली जाता असताना सरकारला तीन चाकी रिक्षाची उपमा विरोधकांकडून दिली जात आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या या कलगीतुऱ्यावर भाष्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनी विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी जुंपली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.