कोरोनाच्या लढ्यात इस्त्रायलची भारताला साथ, 30 सेंकदात होणार कोव्हिड-19 ची चाचणी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक देश एकमेकांना अत्यावश्यक आरोग्य वस्तूंचा पुरवठा करत आहेत. आता इस्त्रायलचे एक उच्च स्तरीय दल भारतात येणार असून, हे दल अवघ्या 30 सेंकदात कोव्हिड-19 च्या चाचणीसाठी तयार किटचे परीक्षण करणार आहे. इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गबी अश्केनाजी आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या देखील चर्चा झाली असून, त्यांना या महामारीच्या लढ्यात सहकार्य अधिक मजबूत करण्याचे वचन दिले आहे.

अश्केनाजी यांनी ट्विट केले की, मी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांना आरोग्य उपकरणांसंदर्भात भारतात रवाना झालेल्या इस्त्रायलच्या उड्डाणाविषयी माहिती दिली. कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात आमची भागीदारी बळकट करण्याचे आम्ही मान्य केले आहे.

इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण संशोधन व विकास महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दोन इस्त्रायली शिष्टमंडळांनी रविवारी भारताच्या दिशेने उड्डाण घेतले आहे.

कोव्हिड -19 च्या चाचणीसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या परिणामाचे परीक्षण करण्यासाठी इस्त्रायली प्रतिनिधीमंडळ भारतात अनेक चाचण्या करणार आहे. इस्रायलने विकसित केलेल्या या पद्धतीद्वारे संक्रमणाची एका मिनिटात माहिती मिळते. या प्रतिनिधीमंडळात जवळपास 20 विशेषज्ञांचा समावेश आहे.