सरकारने घातली 47 चीनी अ‍ॅप्सवर बंदी, पबजी देखील होणार बंद ?

भारत सरकारने मागील महिन्यात राष्ट्रीय सुरक्षेवरून 59 चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. सरकारने आता पुन्हा एकदा 47 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सरकारने जवळपास 250 चीनी मोबाईल अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे. या अ‍ॅप्सवर देखील बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अमरउजालाच्या वृत्तानुसार, सरकार या मोबाईल अ‍ॅप्सची चौकशी करून माहिती मिळवेल की त्यांच्याकडून प्रायव्हेसी नियमांचे उल्लंघन तर केले जात नाही. याशिवाय चिनी इंटरनेट कंपन्यांवर देखील बंदी घातली जाऊ शकते.

सरकारने 250 मोबाईल अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे. यामध्ये पबजी गेम, जिली, कॅपकट, फेसयू, मेइटू, एलबीई टेक, परफेक्ट कॉर्प, सीना कॉर्प, नेटीज गेम्स, अलीएक्सप्रेस, रेसो आणि यूलाईफ सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारने अद्याप या अ‍ॅप्सवर बंदी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सध्या सरकार या चीनी अ‍ॅप्सची विश्वसनीयता तपासत आहे. यातील अधिकांश अ‍ॅपला डेटा शेअरिंग आणि नियमांचे उल्लंघन या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 69-अ अंतर्गत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. या अ‍ॅप्सबाबत मंत्रालयाला अनेक तक्रार आल्या होत्या.