कोरोना लस वाटपासंदर्भात सिरम इंस्टिट्यूटकडून संबंधी महत्त्वाची माहिती


पुणे – देशात कोरोना प्रतिबंधक लस खासगी संस्थांच्या मार्फत न देता सरकारच्या माध्यमातून त्यांचे वाटप करण्यात येईल अशी माहिती सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने दिली आहे. लसनिर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून सिरम इंस्टिट्यूट ओळखली जातो. सिरम इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट करत पारसी समाजासाठी गरजेपेक्षा जास्त लस ठेवण्यासंबंधी ट्विट केल्यानंतर कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

त्या ट्विट स्पष्टीकरण देताना सिरम इंस्टिट्यूटने सांगितले आहे की, दोन पारसींमधील हे मैत्रीपूर्ण संभाषण होते. एकदा लस तयार झाली की सर्वांसाठी ती उपलब्ध असेल. पण त्यासंबंधी आताच काही बोलणे खूप घाईचे ठरेल. कोरोना लसची निर्मिती करण्यासाठी ऑक्सफर्ड आणि त्यांचे पार्टनर AstraZeneca यांच्याकडून पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. कंपनीने लस वाटपासंबंधी बोलताना सांगितले की, ही लस लोकांना बाजारातून खरेदी करावी लागणार नाही. याचे वाटप सरकारमार्फतच केले जाणार आहे. एकदा या लसीची चाचणी पूर्ण आणि यशस्वी झाली की तर तिचे वाटप सरकारमार्फत केले जाईल. जेणेकरुन लोकांना ती थेट खरेदी करावी लागणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा सिरमने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे आपण देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने येथेच चाचणी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. जेणेकरुन लस किती प्रभावी आहे हे तपासता येईल. याआधी सिरमने ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चार ते पाच हजार जणांना चाचणीसाठी कोरोना लस दिलेली असेल अशी माहिती दिली आहे.