फ्रान्स सरकार करणार आपल्या नागरिकांची कोरोनाची मोफत चाचणी


पॅरिस : फ्रान्स सरकारने देशातील नागरिकांसाठी नागरिकांसाठी कोरोनाची चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी यासंदर्भातील घोषणा आरोग्यमंत्री ऑलिव्हर वरेन यांनी केली असून कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांना परतावा मिळणार असल्याचे ओलिवर वरेन यांनी सांगितले.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओलिवर वरेन यांनी म्हटले की, शनिवारी मी एका आदेशावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये आजपासून कोणीही पीसीआर चाचणीसाठी केलेला खर्च पूर्णपणे परत घेऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचा आदेश किंवा वैध कारण आवश्यक नाही. तसेच, कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना हा नियम सुद्धा लागू होणार आहे.

त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी फ्रान्समधील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. पण ते म्हणाले, सध्या दुसऱ्या लाटेबद्दल आम्ही बोलू शकत नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की, गेल्या काही दिवसांत आम्ही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढताना पाहिली आहेत. तर, ही प्रकरणे सतत १३ आठवड्यांपर्यंत कमी होत होती. याचबरोबर, तरुणांना सावध राहण्याचा आणि कोरोनाला हलक्यात न घेण्याचे असे आवाहन ओलिवर वरेन यांनी केले. दरम्यान, फ्रान्समधील तरुणांना सामाजिक समारंभ पुन्हा सुरू करायचे आहेत.

आतापर्यंत फ्रान्समधील कोरोनाबाधितांचा आकडा २,१७,८०१ वर पोहोचला आहे. जगभरात रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा १.६ कोटी झाला आहे. तर ६,४४,००० पेक्षा अधिका लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिकेतील संख्या जास्त आहे. अमेरिकेत ४१, ७८,०२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्राझील दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्राझीमध्ये २३,९४,५१३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.