राम मंदिराचे ई-भूमिपूजन; उद्धव ठाकरेंवर विश्व हिंदू परिषदेची संतप्त टीका


मुंबई – विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राम मंदिराचे भूमिपूजन व्हावे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेने याबाबत अधिकृतपणे पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय फक्त अंध विरोधाच्या भावनेतून सूचवला आहे, प्रखर हिंदुत्वावादी राजकारणाची भूमिका ज्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, त्यांच्या शिवसेनेचे अध:पतन कसे झाले? अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

तसेच भूमिपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असते, यात भूमिची खुदाई करुन पृथ्वीमातेचे पूजा केली जाते, त्याचा आशीर्वाद मागितला जातो, हे काम दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकत नाही. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत देशातील जनता पुढील जीवन जगत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही थोड्या काळासाठी का होईना, पण जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. अमरनाथ यात्रा स्थगित झाल्यानंतरही यात्रेचे धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आल्याचे, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार म्हणाले. त्याचबरोबर केवळ २०० मान्यवरांची उपस्थिती भूमिपूजन कार्यक्रमात असणार आहे, आरोग्यविषयक बाबींचे सर्व नियम या कार्यक्रमासाठी पाळले जाणार आहेत, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांची चिंता विरोध करण्यासाठी केलेले ढोंग असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.