उद्धव ठाकरे, राऊतांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर


मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात भेट घेतली होती. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला होता. ठाकरे यांनी त्यावर दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. मी अमित शहा यांची कशामुळे भेट घेतली एवढेही यांना माहिती नसल्याचा टोला लगावत फडणवीसांनी भेटीमागील कारण सांगितले.

आज भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, त्या मुलाखतीमध्ये विद्वान संपादक, आमचे पटत नसले, तरी ते विद्वान आहेत हे मी मानतो. राज्यसभेचे ते सदस्यही आहेत. मुख्यमंत्र्यांना ते विचारतात की, मी साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन अमित शहा यांना कशासाठी भेटलो. आता यांना एवढे देखील माहिती नाही की, साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शहा हे आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. शरद पवार यांनी सुद्धा साखर उद्योगासंबंधात पत्र लिहिली आहेत, ती काही आदेश बांदेकरांना नाही लिहिलेली. ती त्यांनी अमित शहा यांनाच लिहिली आहेत. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल, तर शेतकऱ्यांचे काय होणार, असा टोला फडणवीस यांनी लगावला.