ए. आर. रहमान यांच्याकडून गटबाजीच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न


बॉलीवूडसह दक्षिणात्य सिनेसृष्टी एकापेक्षा एक सरार्स गाणी देणारे दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांना आजवर अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात विशेष म्हणजे आणि देशाचा गौरव वाढवणारा ऑस्कर पुरस्कार देखील त्यांनी आपल्या नावे केला आहे. पण तेच ए. आर. रहमान सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच ए. आर. रहमान यांनी बॉलीवूडमधील एक गँग आपल्याबद्दल अफवा पसरवत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्याचबरोबर आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत आपल्याला कोणीही काम देण्यासाठी तयार होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. पण त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी यात उडी घेतली होती. वाढलेला वाद पाहता रहमान यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आपले मत व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गमावलेला पैसा परत मिळू शकतो. गेलेली प्रसिद्धी देखील परत मिळू शकते. परंतु आपल्या आयुष्यातील वाया गेलेली वेळ ही पुन्हा मिळत नाही. शांतता, यातून आपण बाहेर पडू. आपल्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे म्हणत ए.आर.रहमान यांनी या वादाला पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ट्विटला रेहमान यांनी रिट्विट करत उत्तर दिले आहे.