नवी दिल्ली : येत्या ३१ जुलैला अनलॉक -२ संपण्याची शक्यता असल्यामुळे अनलॉक -३ साठी एसओपी बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल डिस्टंसिंगचे पालन करून अनलॉक- ३ मध्ये थिएटर उघडण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाने पाठविला असून ज्यामध्ये १ ऑगस्टपासून थिएटर सुरू करण्यासंदर्भात म्हटले आहे.
‘अनलॉक -३’ मध्ये थिएटरसह जिम उघडण्याची शक्यता; गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव
तत्पूर्वी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि थिएटर मालकांमध्ये थिएटर उघडण्यासाठी अनेक बैठका झाल्यानंतर थिएटर मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. पण मंत्रालयाला वाटते की, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरु करावे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
त्याचबरोबर अनलॉक -३ मध्ये थिएटरसोबत जिमदेखील उडण्यास परवानगी देण्यात येऊ शकते. पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने कोणताही विचार करण्यात आला नाही. तसेच देशभरातील राज्यांसाठी अनलॉक-३ मध्ये आणखी काही शिथिलता आणली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. जूनपर्यंत हा लॉकडाऊन सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेल्यानंतर १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-२ येत्या ३१ जुलैला संपणार आहे.