स्वदेशी कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष


मुंबई: देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे देशातील प्रत्येकाची चिंता वाढत आहेत. त्यातच या रोगाचा समूळ नाश करणारी लस प्रत्यक्षात कधी येणार याची प्रतिक्षा प्रत्येकजण करत आहे. त्यातच पूर्णपणे स्वदेशी असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन या लसीचा मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अपेक्षेनुसार या चाचणीचे निष्कर्ष आले आहेत.

शनिवारी कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा हरयाणातील रोहतकमधील मेडिकल सायन्सेस पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूटमध्ये (पीजीआय) पूर्ण झाल्याची माहिती चाचणी घेणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली. पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात ६ जणांना लस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लसीची पहिल्या टप्प्यातली चाचणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारतात ५० जणांना लस टोचण्यात आली. उत्साहवर्धक असे त्याचे निष्कर्ष असल्याचेही वर्मा यांनी म्हटले आहे.

१७ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली. पीजीआय रोहतकमध्ये त्या दिवशी तीन जणांना लस देण्यात आली. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आल्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. याचदरम्यान कोवॅक्सिनसोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने तयार होत असलेल्या कोरोनावरील लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे. त्या चाचणीचे परिणामदेखील उत्साहवर्धक आहेत. लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असून अँटीबॉडीज तयार होत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.