तुकाराम मुंढेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाठराखण - Majha Paper

तुकाराम मुंढेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाठराखण


मुंबई – नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पावरुन थेट तुकाराम मुंढेंविरोधात केंद्राला पत्र लिहिले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व घडामोडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

तुकाराम मुंढे आणि भाजप नगरसेवकांमध्ये नागपुरात वाद सुरु असतानाच मुंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पंगा घेतला असा प्रश्न संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही ही सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या, मंत्रालय की सचिवालय हा वाद कशाला हवा? सचिव पद्धतच बंद करुन टाका, पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड ऑर्डर पण तुम्हीच काढायची, काम पण तुम्हीच करायची, मदतीचे वाटप सगळे तुम्हीच करायचे, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

त्याचबरोबर नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग कोणाच्या मागे मी उभे राहिले पाहिजे. मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे. तुम्ही लोकांच्या हितासाठी एखाद्या अधिकाराच्या कठोरपणाचा उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? काही जणांना काही नियम, कायदे कडकपणाने अंमलात आणले हे परवडत नसेल. पण एखादी गोष्ट तुकाराम मुंढेंनी कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभे राहायला पाहिजे. कोणीच आततायीपणा करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचे हित जोपासले जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल, तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत, हे विसरुन चालणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली.