बृह्नमुंबई महानगरपालिकेचे आवाहन ; नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करा - Majha Paper

बृह्नमुंबई महानगरपालिकेचे आवाहन ; नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करा


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेने कोरानाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशोत्सव साजरा करणा-या भाविकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे म्हणत घरगुती गणपतीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. दोन फूटापेक्षा जास्त या मूर्तीची उंची असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण करणे शक्य होईल, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

जास्तीत-जास्त ५ व्यक्तींच्या उपस्थितीत घरगुती गणेशमूर्तीचे आगमन करावे. आगमनप्रसंगी मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत. दर्शनास येणा-या व्यक्तींना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. त्याचबरोबर त्यांच्या सॅनिटायझरची व्यवस्था करावी. माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील या मूर्तीचे विसर्जन करता येणे शक्य आहे. त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल. विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.