ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘दिल बेचारा’ आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट


अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा अखेरचा दिल बेचारा हा चित्रपट मागील शुक्रवारी रिलीज झाला. त्याचा हा चित्रपट पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे अक्षरशः पाणावले. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होताच त्यावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. त्याचबरोबर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच या चित्रपटामुळे हॉटस्टार क्रॅश झाले होते.

आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर ‘दिल बेचारा’बद्दल डिझ्नी प्लस हॉटस्टारने एक ट्विट केले आहे. एक चित्रपट जो बॉलिवूड चाहत्यांच्या मनात कायम राहील. दिल बेचारा या चित्रपटाला तुमच्या प्रेमामुळे आत्तापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग असलेला चित्रपट बनवले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद, असे ट्विट डिझ्नी प्लस हॉटस्टारने केले आहे. IMDb वर ‘दिल बेचारा’ला 9.8 रेटींग मिळाले आहे. हे रेटींग चित्रपटाच्या रिलीजवेळी 10/10 होते, जो एक विक्रम आहे.

ओटीटीवरचा आत्तापर्यंतचा ‘दिल बेचारा’ सर्वात मोठा हिट चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला 7.5 कोटी व्ह्युज 18 तासांत मिळाले आहेत. ओटीटीवरचे हे व्ह्यूज एक विक्रम असल्याचे मानले जात आहेत. हे आकडे फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. त्याने लिहिले, हॉटस्टारने अद्याप चित्रपटाच्या व्ह्युजचा अधिकृत आकडा जारी केलेला नाही. पण 18 तासांत या चित्रपटाला 7.5 कोटी व्ह्यूज मिळाल्याचे मानले जात आहे. ओटीटी इतिहासात हा सर्वात मोठा सिनेमा आहे. ‘दिल बेचारा’ शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता रिलीज झाला होता. हॉटस्टारवर कुठल्याही सब्सक्रिप्शनशिवाय म्हणजेच फ्री हा चित्रपट रिलीज केला गेल्यामुळे ‘दिल बेचारा’चे व्ह्यूज वाढत आहेत.