दिवाळखोरीवरून होते उर्जित पटेल आणि सरकारमध्ये मतभेद, पुस्तकात केला खुलासा

आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणतेही कारण दिले नव्हते. आता याबाबत उर्जित पटेल यांनी आपले नवीन पुस्तक ‘ओव्हरड्राफ्ट – सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ या पुस्तकात थोडाफार खुलासा केला आहे. सोबतच सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

उर्जित पटेल यांनी पुस्तकात म्हटले आहे की, तत्कालीन अर्थमंत्र्यांसोबत त्यांचे मतभेद दिवाळखोरी प्रकरणांपासून सुरू झाले होते. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरीही 2018 च्या वेळेचा ते उल्लेख करत आहेत त्यावेळी पीयूष गोयल यांनी काही काळासाठी अर्थमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला होता. दिवाळखोरी कायद्यावरून त्यांच्यात आणि सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, पटेल यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 2018 च्या मध्यात दिवाळखोरी प्रकरणात नरमाई दाखवणारे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी अधिकांश कामात अर्थमंत्री आणि उर्जित पटेल एकाच स्तरावर होते. मे 2018 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली हे दिवाळखोरी कायद्याचे नेतृत्व करत होते, मात्र आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. त्यावेळी तत्कालीन उर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात नोटबंदी करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुस्तकात याविषयी काहीही म्हटलेले नाही. त्यांनी आरबीआयच्या मालकीमध्ये सरकारची प्राथमिकता आणि निर्देशांच्या आधारे कर्ज देणे ही आर्थिक क्षेत्राची समस्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील दरी कमी करण्याबाबत ही इशारा दिला असून, यामुळे सरकारचे कर्ज आणखी वाढू शकते असे म्हटले आहे.