भारतातील 'या' दोन राज्यात आयएसआयएस दहशतवाद्यांची मोठी संख्या – संयुक्त राष्ट्र - Majha Paper

भारतातील ‘या’ दोन राज्यात आयएसआयएस दहशतवाद्यांची मोठी संख्या – संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टने दहशतवादाबाबत सावध केले असून, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असे म्हटले आहे. सोबतच या गोष्टीकडे लक्ष वेधले की भारतीय उपखंडात अल-कायदा हल्ल्याचा कट रचत आहे. या संघटनेचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या देशात 150 ते 200 दहशतवादी असल्याचे मानले जाते.

आयएसआयएस, अल कायदा आणि संबंधित व्यक्ती व संघटनेसंदर्भातील विश्लेषणात्मक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय उपखंडात अल-कायदा (एक्यूआयएस) तालिबानच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद आणि कंधार प्रांतामधून काम करते. एक्यूआयएसचा सध्याचा प्रमूख ओसामा महमूद असून, त्याने मारल्या गेलेल्या आसिम उमरची जागा घेतली आहे. एक्यूआयएस मृत्यूचा बदला घेण्यासाठी कट रचत असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, एक सदस्य राष्ट्राने माहिती दिली आहे की, 10 मे 2019 ला घोषित आयएसआयएलचे भारतीय सलग्न (हिंद विलायाह) मध्ये 180 ते 200 सदस्य आहेत. यात म्हटले आहे की केरळ आणि कर्नाटक राज्यात आयएसआयएल सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील वर्षी मे मध्ये इस्लामिक स्टेट (जे आयएसआयएस, आयएसआयएल आणि दाएश नावाने देखील ओळखले जाते.) दहशतवादी संघटनेने भारतात नवीन प्रांत स्थापित केल्याचा देखील दावा केला होता. काश्मिरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही घोषणा करण्यात आली होती.

नवीन शाखेचे अरबी नाव विलायाह ऑफ हिंद (भारत प्रांत) आहे. मात्र जम्मू-काश्मिरच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने हा दावा फेटाळला होता.