‘आपत्तीमध्येही गरिबांकडून कमाई करत आहे सरकार’, राहुल गांधींची जोरदार टीका

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आपत्तीच्या काळात देखील गरिबांकडून नफा वसूल करण्यात कोणतीही कसर सोडत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आजाराचे ढग दाटलेले असतानाही, भारतीय रेल्वे नफा कमाविण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी एका रिपोर्टच्या आधारावर सरकारवर निशाणा साधला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात भारती रेल्वेने श्रमिक विशेष ट्रेनद्वारे 428 कोटी रुपयांची कमाई केली.

यावर ट्विट करत राहुल गांधी म्हणाले की, आजाराचे ढग दाटलेले आहेत. लोक अडचणीत आहेत. फायदा उचलता येईल – आपत्तीला नफ्यात बदलून कमाई करत आहे गरिब विरोधी सरकार.

सरकारने 25 मार्चला कोरोना व्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाऊन केला होता. अनेक राज्यांमध्ये कामगार अडकले होते. दोन-तीन महिन्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करत कामगारांना घरी परतण्यासाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली होती. मात्र रेल्वे तिकिटाच्या पैशांवरून वाद झाला होता. कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेण्यात आले होते. मात्र सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले होते की, प्रवासाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे व 15 टक्के राज्य सरकारला द्यावा लागेल.