मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण - Majha Paper

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती स्वतः ट्विट करत दिली आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांच्यासोबत प्रवास केलेले कॅबिनेट मंत्री अरविंद भदौरिया यांचा रिपोर्ट देखील पॉजिटिव्ह आला होता.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत माहिती दिली की, कोव्हिड-19 ची लक्षणे दिसत होती. चाचणीमध्ये माझा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. माझी विनंती आहे की, जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. माझ्या जवळील लोकांनी क्वारंटाईनमध्ये जावे.

त्यांनी सांगितले की, मी सर्व गाईडलाईन्सचे पालन करत असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन करेल. याशिवाय दररोज व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या स्थितीची समिक्षा करण्यासाठी बैठक देखील घेईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना व त्यांच्या आईंना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी यावर मात केली होती.