‘आमच्यामध्ये पडू नका, भारत आणि आम्ही बघून घेऊ’, ब्रिटनवर भडकला चीन - Majha Paper

‘आमच्यामध्ये पडू नका, भारत आणि आम्ही बघून घेऊ’, ब्रिटनवर भडकला चीन

अमेरिकेसोबतच आता ब्रिटनबरोबर देखील चीनचे संबंध बिघडत चालले आहेत. भारतातील ब्रिटन उच्चायुक्ताने लडाखमधील चीनच्या हालचालींना चिंताजनक असल्याचे म्हटल्यानंतर, आता चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे राजदूत सून वेईदोंग म्हणाले की, ब्रिटिश उच्चायुक्त फिलिप बार्टन यांचे चीनबाबतचे वक्तव्य चुकीचे आणि खोटे आहे.

वेईदोंग म्हणाले की, भारत-चीनमधील सीमावाद हा द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देशांकडे मतभेद सोडविण्यासाठी पर्याप्त क्षमता आहे. भारत-चीनच्या सीमावादामध्ये तिसऱ्या पक्षाने मध्यस्थी करण्याची गरज नाही.

ब्रिटिश उच्चायुक्त फिलिप बार्टन यांनी हाँगकाँग आणि एलएसीवरील चीनच्या हालचाली चिंताजनक असल्याचे म्हटले होते. उईगर मुसलमानांवर चीनमध्ये होणाऱ्या अत्याचारावरही त्यांनी टीका केली होती. चीनच्या हालचालींद्वारे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी अमेरिकेसोबत मिळून काम करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.

दक्षिण चीन सागर आणि हाँगकाँगबाबत ब्रिटनच्या विधानानंतर चीनी राजदूताने अमेरिकेकडे इशारा करत म्हटले की, दक्षिण चीन सागरात खरे आव्हान क्षेत्राच्या बाहेरून येत आहे. जे समुद्री वादाला प्रोत्साहन देऊन शांती आणि स्थिरता नष्ट करत आहे. हाँगकाँगच्या मुद्यावर चीन कोणत्याही दुसऱ्या राष्ट्राला दखल देण्याची परवानगी देत नाही.

दरम्यान, ब्रिटन आणि चीनमधील तणाव मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ब्रिटनने 5जी मोबाईल नेटवर्कमधून चीनी कंपनी ह्युवाईवर बंदी घातली आहे.