गँग अफवा पसरवत असल्याने मला काम मिळत नाही – एआर रेहमान

ऑस्कर विजेते संगीतकार एआर रेहमानने म्हटले आहे की एक गँग त्यांच्याविरोधात अफवा पसरवत आहे व त्यांना हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळविण्यापासून रोखत आहे. रेडिओ मिर्चीशी बोलताना रेहमान यांना तामिळ सिनेमाच्या तुलनेत हिंदीमध्ये का कमी करता ?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी चांगल्या चित्रपटांना नकार देत नाही. पण मला वाटते एक गँग आहे जी काही गैरसमजामुळे चुकीच्या अफवा पसरवत आहे.

एक घटना सांगताना रेहमान म्हणाले की, मुकेश छाबडा माझ्याकडे आला होता, मी दोन दिवसात 4 गाणी दिली. त्याने मला सांगितले की, सर, अनेकांनी मला सांगितले की एआर रेहमानकडे नको जाऊस आणि मला अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीत. मी डार्क चित्रपट करतो, त्यामुळे एक संपुर्ण गँग माझ्याविरोधात काम करत आहे. त्यांना माहित ही नाही की ते नुकसान पोहचवत आहेत.

त्यांनी सांगितले की, लोकांना माझ्याकडून काही गोष्टी करण्याची अपेक्षा आहे. मात्र गँग ते घडण्यापासून रोखत आहे. हे ठीक आहे. कारण माझा नशीबावर विश्वास आहे व माझा विश्वास आहे की सर्वकाही देवाकडून येते. त्यामुळे मी माझे चित्रपट व काम करत आहे. सुंदर चित्रपट बनवा व तुमचे माझ्याकडे स्वागत आहे.

दरम्यान, एआर रेहमान यांचे संगीत असलेला दिल बेचारा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.