कोरोनाचे भयानक वास्तव! नोकरी गेली, खाण्यासाठी काही नाही म्हणून बापानेच बाळाला विकले

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या या महामारीत गेल्या आहेत. कोरोनाचे भयानक वास्तव आता हळूहळू समोर येऊ लागले आहे. आसाममध्ये याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला अवघ्या 45 हजार रुपयांसाठी विकले.

आसामच्या कोकराझार जिल्ह्यातील ही घटना आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. ज्यामुळे कुटुंबाने बाळाला विकण्याचा निर्णय घेतला. हैराण करणारी गोष्ट म्हणजे स्वतः पित्याने आपल्या बाळाला विकले.

दीपक भ्रमा असे या व्यक्तीचे नाव असून, ते प्रवासी कामगार आहेत. त्यांना तीन मुले आहेत. लॉकडाऊनमध्ये पैसे कमवण्याचे कोणतेही साधन नाही. खाण्यासाठी घरात काहीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्वतःच्याच बाळाला विकण्याची वेळ आली. दीपक हे गुजरातमध्ये काम करत असे. मात्र लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर ते आसामला आले. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक स्थिती आणखीनच बिघडली.

 दीपकने बाळाला विकल्याची माहिती स्थानिक एनजीओला समजल्यावर, त्यांनी पोलिसांच्या मदतीने बाळाला सोडवले. या प्रकरणात पोलिसांनी पित्याला आणि आणखी दोन जणांना अटक केले आहे.