अमेरिका-चीनमधील वाद अजून वाढणार, भारतासाठी स्थिती महत्त्वाची – रघुराम राजन

अमेरिकेत पुढील काही महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. अशा स्थितीमध्ये अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढणार आहे. यामुळे जागतिक व्यापाराची स्थिती बिघडेल, असे मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. राजन म्हणाले की, कोव्हिड-19 च्या काळात पुन्हा उघडण्यास सुरूवात झालेल्या भारत आणि ब्राझील सारख्या अर्थव्यवस्थेसाठी ही स्थिती खूप महत्त्वाची आहे. याशिवाय अशा अनेक कंपन्या असतील ज्या डबघाईला आलेल्या आहेत. महामारीनंतर पुनरुज्जीवन प्रक्रियेबरोबरच आपल्याला गोष्टी सुधारण्याची देखील आवश्यकता आहे.

‘द न्यू ग्लोबल इकोनॉनिक नॉर्म: पोस्ट कोव्हिड-19’ या विषयावरील समेंलनात बोलताना ते म्हणाले की, अमेरिका-चीनमधील तणाव भारत, ब्राझील आणि मेक्सिको सारख्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. हे देश जेव्हा अर्थव्यवस्था उघडत असतील, त्यावेळी त्यांना मागणीची गरज असेल, ज्यातून ते सावरू शकतील.

राजन म्हणाले की, अनेक देश असे आहेत जेथे लॉकडाऊन असतानाही नियंत्रण करता आले नाही. अमेरिका याचे प्रमुख उदाहरण आहे. भारत, ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये देखील असेच झाले. परंतु, या देशांनी यासाठी मोठा खर्च केला. सध्या मुद्दा संसर्ग रोखण्याचा आहे. दुर्दैवाने हे संक्रमण बरेच पसरले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही.

वर्क फ्रॉम होमविषयी बोलताना ते म्हणाले की, विकसित देशांमध्ये 40 ते 50 टक्के लोकसंख्या वर्क फ्रॉम होम करू शकते. अशा स्थितीत लॉकडाऊन असतानाही तेथे काम सुरू राहील. मात्र गरीब आणि विकासशील देश व उदयोन्मुख बाजारपेठेत फारच कमी लोक घरून काम करु शकतात.