बंदीला वैतागले ByteDance, अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

भारत सरकारने काही दिवसांपुर्वी 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. या अ‍ॅप्समध्ये सर्वाधिक चर्चा आणि सर्वाधिक नुकसान हे शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकचे झाले. अमेरिका देखील या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टीक-टॉकविरोधात जाहिरातबाजी करत आहेत.

अनेक देश या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत, अशा स्थितीमध्ये टीक-टॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स वाईट पद्धतीने अडकली आहे. वारंवार होणाऱ्या बंदीतून बाहेर पडण्यासाठी कंपनी टीक-टॉकला अमेरिकेला विकू शकते.

फायनेंसियल टाईम्सच्या वृत्तानुसार, सिकोइया आणि जनरल अटलांटिका टिक-टॉकची मोठी हिस्सेदारी खरेदी करू शकतात. या संदर्भात ट्रेजरी डिपार्टमेंटशी चर्चा सुरू आहे. मात्र गुंतवणुकीनंतर या अ‍ॅपला अमेरिकेत मंजूरी मिळेल की नाही, यावर या कंपन्या विचार करत आहेत.

चीन आणि अमेरिकेतील तणाव आधीपासूनच आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांसोबतचे चीनचे संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने याआधी देखील आरोप केला आहे की टेक कंपन्यांच्या मदतीने चीन अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करत आहे.