19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवला जाऊ शकतो यंदाचा आयपीएल


नवी दिल्ली: यंदाचा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये खेळवला जाऊ शकतो. तर आयपीएलचा अंतिम सामना आठ नोव्हेंबरला खेळवला जाऊ शकतो. वृत्तसंस्था पीटीआयला ही माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी गुरुवारी दिली आहे.

पुढील आठवड्यात आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे, आयपीएलबाबत अंतिम रुपरेषा या बैठकीत ठरणार आहे. त्याचबरोबर अशीही माहिती मिळाली आहे की, आपल्या निर्णयाबाबत फ्रेंचायजींना देखील बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्ण शक्यता आहे की, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. यानुसार आयपीएल 13 व्या हंगामाचे हे आयोजन 51 दिवसांचे असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आयपीएलचे आयोजन होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असे सांगितले जात होते, पण आता एक आठवडा आधीच सुरु होऊ शकतो, कारण त्यानंतर टीम इंडियाचा आस्ट्रेलिया दौरा होणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाला आस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार त्या दौऱ्यात 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.