राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल


प्रयागराज – सर्वोच्च न्यायालयाने अयोद्धेतील राम मंदिरासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर आता राम मंदिराच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान ५ ऑगस्टला राम मंदिरांच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. पण कोरोना अनलॉक २ च्या मार्गदर्शक नियमावलीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम हा उल्लंघन करत असून भूमिपूजनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ही जनहित याचिका दिल्लीतील पत्रकार साकेत गोखले यांनी दाखल केली असून देशावर ओढावलेले कोरोनाचे अद्याप कायम आहे. त्याचबरोबर जवळपास तीन महिन्यांहून अधिककाळच्या दीर्घ लॉकडाऊननंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक २ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी जवळपास ३०० लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शकतत्वांचे यामुळे उल्लंघन होत असल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आलेले अपयशामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुद्दा समोर करून सरकार नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.