महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप आयटी सेलकडे होती निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाची जबाबदारी ?

देशात स्वच्छ आणि निष्पक्षपाती निवडणुका पार पाडण्याचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगावर आता पक्षपात आणि डेटा लीक सारखे आरोप लागले आहेत. निवडणूक आयोगावर आरोप आहे की त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या देखरेखचे काम भाजपचे नेते आणि आयटी सेलला दिले होते. म्हणजेच आयोगाचा डेटा एका खाजगी कंपनीकडे होता, जिचा राज्यातील तत्कालीन सत्ताधारी पक्षाशी संबंध होता. आज तकने या बाबत वृत्त दिले आहे.

आयोगाचे सोशल मीडिया हँडल, वेबसाईट, पेज आणि यातील डेटाची जबाबदारी एका खास राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे होती. आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या आरोपानंतर आता निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील सीईओकडून उत्तरे मागितली आहेत.

सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या जनजागृती अभियान आणि संपुर्ण निवडणूक मिशनवर लक्ष ठेवण्याचे काम ज्या कंपनी आणि व्यक्तीला होते, ते भाजपची युवा विंग बीजेवायएमच्या आयटी सेलचे संयोजक आहेत. या व्यक्तीचे नाव देवांग दवे असून, त्यांच्या कंपनीचे नाव सोशल सेंट्रल मीडिया सोल्यूशन एलएलपी आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडल आणि पेजवर तोच पत्ता होता, जो त्या व्यक्तीचा होता. सोशल सेंट्रल मीडियाच्या क्लांइट लिस्टमध्ये भाजप आणि महाराष्ट्रच्या मुख्य निर्वाचन अधिकाऱ्याच्या कार्यालयाचा देखील समावेश आहे.

या संदर्भात प्रश्न माजी पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्विटरवर विचारले आहेत. हे आरोप देवांग दवे यांनी फेटाळले असून, प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे निराधार आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावर आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.