सोशल मीडियावरील बनावट Bots विरोधात गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले कारवाईचे आदेश


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण याच दरम्यान लोकांमध्ये फेक बातम्या पसरवून दहशत निर्माण करणे, ट्रोल करणे यांसारखे टुकार धंदे करणा-या खोट्या फॉलोअर्सची संख्या देखील वाढत असल्यामुळे अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी पीआर एजन्सीज खोटे फॉलोअर्स बनवतात. त्यामुळे चुकीच्या पोस्ट आणि स्टार्सना ट्रोलिंग करण्याचे प्रकार देखील वाढले असल्यामुळे अशांवर महाराष्ट्र पोलिस कडक कारवाई करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

कलाकारांचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी आणि या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक पीआर एजन्सीज सोशल मिडियावर अनेकदा खोटे फॉलोअर्स बनवितात, ज्याला Bots (बॉट्स) म्हणतात. यामुळे कलाकारांना ट्रोलिंग करणे आणि चुकीच्या खोट्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल करणे यांसारखे प्रकार देखील सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी अशा बॉट्सवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत.

लोकांमध्ये अनेकदा अशा खोट्या फॉलोअर्समुळे आणि त्यांच्याकडून होणा-या या चुकीच्या गोष्टींमुळे भीतीचे वातावरण पसरते. त्यासोबतच कलाकारांना या ट्रोलर्सचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गृहमंत्र्यांनी या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि या खोट्या फॉलोअर्सला चाप बसण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोक आधीच पिचून गेले आहेत. अशातच या बॉट्समुळे लोकांना विशेषत: कलाकारांना आणखी त्रास सहन करावा लागू नये यासाठी अनिल देशमुखांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.