व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार कर्ज, विमा आणि पेंशन सेवा

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आता भारतात नागरिकांना कर्ज देणार आहे. कंपनीने यासाठी अनेक भारतीय बँकांसह भागीदारी केली आहे. याशिवाय कमी उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील आता व्हॉट्सअ‍ॅप विमा आणि पेंशनची व्यवस्था करणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने या सेवेसाठी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या या सेवेंतर्गत ग्रामीण भागात विमा आणि पेंशन देणार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस यांनी सांगितले की, कंपनी येणाऱ्या वर्षात आणखी बँकांसोबत भागीदारी करणार आहे व कमी उत्पन्न असणारे व ग्रामीण भागातील लोकांसाठी बँकिंग सेवा सोपी करण्याचा प्रयत्न आहे.

बँकेसोबत भागीदारी अंतर्गत ग्राहक बँकेला ऑटोमेटेड टेक्स्टद्वारे संवाद साधू शकतील. यासाठी बँकेत व्हॉट्सअ‍ॅप नंबर रजिस्टर करावा लागेल. यानंतर ग्राहकांना खात्यातील रक्कमेपासून ते खात्यासंबंधी इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या प्रमुखांनी म्हटले की, येत्या दोन वर्षांत बँकांसोबत मिळून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी विमा, मायक्रो क्रेडिट आणि पेन्शनसारख्या सुविधा सुलभ करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी लवकरच पायलट प्रकल्प सुरू करण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप दोन वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवेचे टेस्टिंग करत आहे. मात्र अद्याप सरकारकडून याला परवानगी मिळालेली नाही.