त्या प्रकरणावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची प्रतिक्रिया


नवी दिल्ली : खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक संघटना आणि नेत्यांकडून नायडू यांचा निषेध नोंदवला जात आहे. यावर आता राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. नायडूंनी आपल्या ट्विटमध्ये, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक आहे, त्याचबरोबर भवानीमातेचा उपासक राहिलो आहे. त्यामुळे मी त्यांचा अजिबात अनादर केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मी नेहमीच खंदा आणि जाहीर प्रशंसक, तर भवानी मातेचा उपासक राहिलो आहे. अशा कोणत्याही घोषणा शपथ घेताना दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. त्यामुळे मी कोणाचाही अनादर केलेला नाही, असे ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

तत्पूर्वी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसे काही झालेच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, असे म्हणत शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे. सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर आक्षेप घेतला. राजकारण करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असे उदयनराजे भोसले म्हणाले.