आयपीएलसाठी टी20 वर्ल्ड कपला स्थगिती, पाकच्या माजी खेळाडूंनी ओकली गरळ

आयसीसीने या वर्षी पार पडणारा टी20 वर्ल्ड कप अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपचे आयोजन करणे शक्य नसल्याचे आधीच आयसीसीला सांगितले होते. मात्र पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना ही गोष्ट आवडली नसून, वर्ल्डकप स्थगितीसाठी पाकिस्तानचे माजी खेळाडू बीसीसीआय आणि आयपीएलला जबाबदार धरत आहेत.

पाकिस्तानचे माजी खेळाडू राशिद लतीफ आणि शोएब अख्तरने वर्ल्डकप स्थगित झाल्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्ल्ड कप व्हावा अशी बीसीसीआयची इच्छा नाही. बीसीसीआय एक शक्तीशाली बोर्ड आहे, ज्याच्या जोरावर आयसीसीकडून आपल्याला हवे ते करून घेतले. दोन्ही खेळाडूंचे म्हणणे आहे की, बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करायचे आहे, म्हणून टी20 वर्ल्डकप स्थगित केला गेला. अन्यथा आशिया कप आणि टी20 वर्ल्ड कप या स्थितीमध्येही झाला असता.

अख्तरने यावर म्हटले की, एक शक्तीशाली व्यक्ती आणि शक्तीशाली क्रिकेट बोर्डच अशी धोरणे ठरवते. वर्ल्डकप आणि आशिया कप या वर्षी खेळता आला असता. ही भारत-पाकिस्तानला एकमेकांविरोधात खेळण्याची संधी होती, जी त्यांनी घालवली. आयपीएलला कोणतेही नुकसान होऊ नये, भलेही वर्ल्ड कप गेला खड्ड्यात. अशा निर्णयांमुळे क्रिकेटचा स्तर कमी होईल. परंतु, लोक या खेळातून कोट्यावधी डॉलर्स मिळवतात.

राशिद लतीफने देखील अख्तरचा मुद्दा पुन्हा गिरवत म्हटले की, आयसीसीने वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला कारण यामुळे क्रिकेट बोर्डाला फायदा होत होता.