चेतन भगतचा धक्कादायक खुलासा! 'त्या' व्यक्तीमुळे माझ्यावर आली होती आत्महत्येची वेळ - Majha Paper

चेतन भगतचा धक्कादायक खुलासा! ‘त्या’ व्यक्तीमुळे माझ्यावर आली होती आत्महत्येची वेळ


बॉलिवूडमधील घराणेशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच सोशल मीडियावर स्टार किड्सना सळो की पळो करुन सोडण्यात येत आहे. आता लेखक चेतन भगत यांनी देखील घराणेशाहीच्या या वादात उडी घेतली आहे. निर्माता विधू विनोद चोप्रा यांनी मला धमकावले होते. त्याचबरोबर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप चेतन भगत यांनी केला आहे.

उद्या प्रेक्षकांच्या भेटीला ‘दिल बेचारा’ हा सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट येणार आहे. काही समिक्षकांनी या चित्रपटावर टीका केली होती. चेतन भगत यांनी या टीकेवर ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला. पण चेतन भगत यांचे हे ट्विट विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी, प्रसिद्ध समिक्षक अनुपमा चोप्रा यांच्या पचनी पडले नाही. त्यांनी चेतन भगत यांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करु नका, असे बजावले. या प्रतिक्रियेवर प्रत्तुत्तर देताना त्यांनी विधू विनोद चोप्रा यांच्यावर निशाणा साधला. मॅडम जेव्हा तुमच्या पतीने मला जाहीरपणे धमकावले. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट कथानकाला मिळणारे सर्व पुरस्कार निर्लज्जपणे बळकावले. माझ्या कथेचे श्रेय नाकारले. मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले तेव्हा तुम्ही कुठे होता?, अशा आशयाचे ट्विट करुन चेतन भगत यांनी विधू विनोद चोप्रा यांच्यावर टीका केली आहे.