राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुर्हूतावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रश्नचिन्ह


नवी दिल्ली : 5 ऑगस्टचा मुहूर्त अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नक्की करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी दुपारी 12 वाजता पूजा करून मंदिराची पायाभरणी करतील. पण, आता या भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, जनतेचे मत मंदिराच्या बांधकामासाठी घ्यावे, अशी मागणीही शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे.

आम्ही रामभक्त असून आम्हाला देखील राम मंदिर बांधण्यात आनंद होईल, पण त्यासाठी योग्य तारीख व शुभ मुहूर्त असावा, असे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक पैशाने राम मंदिर बांधायचे आहे, तेव्हा मंदिराचे मॉडेल कसे असावे याबद्दलही जनतेचे मत घेतले पाहिजे, असे स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. तसेच, कंबोडियातील अंगकोर वॅटसारखे विशाल आणि भव्य राम मंदिर असावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अयोध्येतील साधू-संतांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी थेट शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना आव्हान दिले आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना जर हनुमान चालीसा ते ऋग्वेदपर्यंत ज्ञान असल्यास, त्यांनी याठिकाणी येऊन 5 ऑगस्ट रोजी भूमीपूजन करणे चुकीचे आहे, हे सिद्ध करावे, असे म्हटले आहे.