लॉकडाऊनमधून पुणेकरांची सुटका नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश


पुणे : पुणेसह पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज रात्री 12 वाजता पुण्यातील 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. पण आधीचेच नियम शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आहे तसेच राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनीपुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचे सांगितले आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, पण दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. परिणामी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आल्यामुळे बाजारपेठ आणि लग्न समारंभाबाबत प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु एवढ्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि त्यात गटारी अमावस्येमुळे पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसांत तब्बल 14109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.