सर्वात प्रथम मुंबई-पुण्यातील 5 हजार जणांवर होणार ऑक्सफोर्ड-सिरमच्या लसीचे ट्रायल

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सिरम इंस्टिट्यूटच्या लसीची सर्वात पहिली चाचणी पुणे आणि मुंबईच्या हॉटस्पॉट झोनमधील जवळपास 5 हजार लोकांवर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लसीचे स्थानिक उत्पादक असलेल्या सिरम इंसिट्यूटला आशा आहे की, सर्वकाही व्यवस्थित पार पडल्यास पुढील वर्षीपर्यंत लस बाजारात येईल. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीला कोरोना लसीचे चांगले परिणाम मिळत आहेत. आता ब्रिटनमध्ये याची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. भारतात सिरम इंस्टिट्यूटला लसीबाबत अंतिम परवानगी मिळाल्यानंतर याचे फिल्ड ट्रायल केले जाईल.

पुण्यात कालपर्यंत 59 हजारांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर मुंबईतील आकडाल 1 लाखांच्या पुढे गेला आहे. सिरम इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले की, मुंबई आणि पुण्यात लसीच्या ट्रायलसाठी काही भाग निश्चित केले आहेत. या शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. ज्यामुळे लसीच्या प्रभावाबाबत आकलन करण्यास मदत मिळेल.

पुनावाला यांनी सांगितले की, सुरूवातीच्या टप्प्यात हे सिद्ध झाले आहे की लस सुरक्षित आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या लसीच्या ट्रायलमध्ये वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश केला जाईल. त्यांनी सांगितले होते की, पुढील महिन्यात या लसीचे ट्रायल सुरू होईल. याशिवाय लसीच्या किंमतीची देखील काळजी घेतली जाईल व याची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. या लसीचे अब्जावधी डोस तयार केले जात आहेत.