आता उपराष्ट्रपतींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रे पाठवणार राष्ट्रवादी


मुंबई – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून २० लाख पत्रे पाठवण्यात येणार असून ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा या सर्व पत्रांवर लिहिलेली असणार आहे. काल राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशी घोषणाबाजी यापुढे करु नये अशी समज दिली. त्याच पार्श्वभूमीवर ही पत्रे उपराष्ट्रपतींनी पाठवण्यात येणार आहेत.

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोहीम राबवली जात असून शरद पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या याच मोहिमेला व्यंकय्या नायडूंना २० लाख पत्र पाठवून उत्तर देणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली.

आपल्याच पक्षाच्या खासदाराला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखले. यावरुन भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आले. तसेच भाजप नेत्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल किती द्वेष आहे आहे हे दिसून येते. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २० लाख पत्रे पाठवून निषेध केला जाणार असल्याची माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे.

काल राज्यसभेत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे सदस्य उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.