शिवछत्रपतींचा अपमान झाला असता तर, जागीच राजीनामा दिला असता: उदयनराजे भोसले


नवी दिल्ली : खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने समज दिल्याचे काल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक संघटना आणि नेत्यांकडून नायडू यांचा निषेध नोंदवला जात आहे. यावर आता उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. राजकारण करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले आहे. शिवछत्रपतींचा अपमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, जागीच राजीनामा दिला असता. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?, असा प्रश्नही यावेळी उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला.

बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना असे नाव ठेवावे, असेही उदयनराजे भोसलेंनी सांगितले. संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही. संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारत आहेत, असे उदयनराजे म्हणाले. शरद पवार तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडले नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती करतो, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

Loading RSS Feed