75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन होणार युएनची महासभा

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाचा संपुर्ण जगावर परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेवर देखील याचा परिणाम होणार आहे. यंदा ही महासभा वेगळ्या पद्धतीने होणार आहे. या वर्षी जगभरातील नेते या महासभेला स्वतः उपस्थित न राहता, आपल्या भाषणांचे व्हिडीओ पाठवणार आहेत. संयुक्त राष्ट्राकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

सांगण्यात आले आहे की, अनेक नेत्यांनी कोरोना संकटामुळे यूएनला येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हाच उत्तम पर्याय आहे. या वर्षी संयुक्त राष्ट्र आपले 75 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. मात्र अनेक देशात हवाई वाहतूक बंद असल्याने मोठ्या संख्येने अधिकारी येणे शक्य नाही.

संयुक्त राष्ट्रानुसार, कोणत्याही देशाचे प्रतिनिधी, नेते किंवा अन्य प्रमुख व्यक्ती आपला संदेश आधीच पाठवू शकतात. जेणेकरून, वेळापत्रकानुसार तो व्हिडीओ संदेश चालवला जाईल. यावेळी मात्र त्या देशांचे कायमस्वरूपी प्रतिनिधी उपस्थित असतील.

जगातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महासभेकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष असते. यात 193 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याने, प्रतिनिधी व्हिडीओ संदेश पाठवणार आहेत.