‘या’ राज्यात मास्क लावला नाही तर भरावा लागू शकतो 1 लाखांचा दंड


झारखंड – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र तसेच देशभरातील राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक राज्यातील सरकारकडून सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे, सार्वजनिक जागेवर थुंकल्यास दंड आकारणे, मास्क न घालणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आणि नियमित मास्कचा वापर न केल्यास झारखंडमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचा दंड आणि 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. झारखंडच्या मंत्रिमंडळाने बुधवारी यासंदर्भातील संसर्गजन्य रोग अध्यादेश 2020 मंजूर केला आहे. ही शिक्षा सिक्युरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि मास्क न वापरणाऱ्यांना होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर जर नियमांचे एखाद्याने उल्लंघन केले किंवा नवीन नियमांतर्गत मास्क घातला नसेल तर त्याला 2 वर्ष तुरूंगात रहावे लागू शकते. पण हा नियम मंत्रिमंडळाने सर्वांसाठी लागू केला असला तरी अद्याप या कायद्यांतर्गत कुणालाही शिक्षा झालेली नाही. झारखंडच्या राजधानी रांचीच्या अनेक नागरिक मास्कशिवाय फिरतांना आढळून आले आहेत.

झारखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार झारखंडमध्ये एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 485 एवढी झाली असून त्यामध्ये 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3024 या आजारातून रूग्ण बरे झाले आहेत, सद्यस्थितीला झारखंडमध्ये 3397 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.