अमेरिकेसोबत मिळून ड्रोनची निर्मिती करणार भारत!

अमेरिका आणि भारत एकत्र येऊन ड्रोन विकास कार्यक्रम सुरू करण्याविषयी चर्चा सुरू आहे. पेंटागनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेद्वारे आयोजित भारत विचार समेंलनाला संबोधित करताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन हवाई दलाच्या प्रयोगशाळांनी मानव रहित हवाई वाहनांच्या (यूएव्ही) निर्मितीसंदर्भात भारतीय स्टार्टअपबरोबर संशोधन व विकास करारावर स्वाक्षरी केली आहे. हे हवाई वाहन थेट आकाशातून सोडता येईल.

एलेन एम लॉर्ड यांनी सांगितले की, मानवरहित हवाई वाहन हे अमेरिकन हवाई दलाची प्रयोगशाळा, भारतीय हवाईदल, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय स्टार्टअप कंपनीसाठी सामायिक विकास कार्यक्रम असेल.

अमेरिका-भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड कॅम्पेनच्या (डीटीटीआय) पेंटागॉनचे प्रतिनिधी लॉर्ड यांनी सांगितले की डीटीटीआयची पुढील गट सभा 14 सप्टेंबरच्या आठवड्यात आणि डीटीटीआय इंडस्ट्रियल अलायन्स फोरमची दुसरी बैठक त्याच्या आठवड्यापूर्वी घेण्याची योजना आहे.

लॉर्ड यांनी सांगितले की, अमेरिका आणि भारत यांच्या संरक्षण सहकार्याने चांगली प्रगती केली आहे. या सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत व इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता निर्माण झाली आहे. भारताला अमेरिकन संरक्षण विक्री गेल्या 10 वर्षात वेगाने वाढली आहे आणि संरक्षण उपायांच्या बाबतीत अमेरिका भारताची पहिली पसंती होण्याचा प्रयत्न करत आहे.