कौतुकास्पद! कोरोनातून बरे झालेल्या उद्योगपतीने गरिबांसाठी उघडले हॉस्पिटल

कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये सर्वाधिक भिती ही सध्या उपचाराची आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, तर खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल येत आहे. मात्र अशाही स्थितीमध्ये अनेकजण मन मोठे करत मदतीसाठी पुढे येत आहेत. गुजरातच्या सुरत येथे एका रियल इस्टेट उद्योगपतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी उपचार घेतला व ते बरे देखील झाले. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी येथेच न थांबता गरिबांच्या उपचारासाठी एक हॉस्पिटलच उघडले.

सुरतच्या 63 वर्षीय कादर शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. येथे त्यांनी उपचारासाठी भरपूर पैसे खर्च केले. यावेळी त्यांन जाणीव झाली की गरीब व्यक्तीला अशा स्थितीत किती कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल.

हॉस्पिटलमधून बरे झाल्यावर घरी आल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या ऑफिसलाच हॉस्पिटलमध्ये बदलण्याचे काम सुरू केले. त्यांनी आपल्या 30 हजार स्क्वेअर फूट ऑफिसमध्ये 85 बेड्स आणि ऑक्सिजन सिलेंडर देखील लावले. येथे आता गरिबांवर मोफत उपचार होत आहे. त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंसाठी सुरत महानगरपालिकेशी एक करार देखील केला आहे. त्यांच्या या हॉस्पिटलचे नाव हीबा हॉस्पिटल असून, त्यांची नातीच्या नावावरून हे नाव ठेवले आहे.

शेख आणि त्यांची तिन्ही मुले या महामारीत लोकांची मदत करत आहे. आता हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्ससाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा देखील ते विचार करत आहेत.