अरे देवा ! परीक्षार्थीच निघाले कोरोनाबाधित, पालकांमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कारण देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या पार पोहचला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुट्टी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण 16 जुलै रोजी केरळमध्ये इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल (केईएएम) प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पण या परीक्षेला बसलेले काही विद्यार्थी हे कोरोनाबाधित असल्याची माहिती आता समोर आली आहे.

या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावरही मोठा गोंधळ झाला होता. पालकांनी आपल्या मुलांना सोडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे या दरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमचा फज्जा उडाला. त्यामुळेच जवळपास 600 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या परीक्षेला हजारो विद्यार्थी उपस्थित होती. त्यातील अनेक विद्यार्थी हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

याआधी देखील अशीच एक धक्कादायक कर्नाटकमध्ये घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी कर्नाटक बोर्डाने SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झालेली होती. विद्यार्थ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कर्नाटकामधील जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा 25 जूनपासून सुरू झाली होती. पण परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.