देशात काल दिवसभरात ४५,७२० नव्या रुग्णांची नोंद; तर १,१२९ जणांचा मृत्यू - Majha Paper

देशात काल दिवसभरात ४५,७२० नव्या रुग्णांची नोंद; तर १,१२९ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असली तरी दररोज होणाऱ्या नव्या रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. त्यातच आज आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोनाचे ४५ हजार ७२० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाखांच्या पुढे गेला आहे.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ एवढी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पण यात चिंताजनक बाब अशी की मागील २४ तासांत देशात एक हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ एवढी झाली आहे. तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजे ८४.८३ टक्के आहे.

तर महाराष्ट्रात मागील २४ तासांत १०,५७६ नवे रुग्ण आढळले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात २८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सुमारे साडेपाच हजार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३९,३५३ रुग्ण उपचाराधीन आहेत.