व्हिडीओ : ताशी 300 किमी वेगाने सुसाट पळवली बाईक, युवकाला अटक

कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात रिकाम्या रस्त्याचा फायदा घेत सुसाट वेगाने गाडी चालविण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. असाच एक तुफान वेगाने गाडी चालवणाऱ्या बंगळुरू येथील युवकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युवक आपली यमाहा आर1 बाईक तब्बल ताशी 300 किमी वेगाने चालवत आहे. मात्र त्याच्या या स्टंटने त्याला जेलमध्ये पोहचवले आहे.

आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, राइडरकडून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. स्वतःचा व दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून ईसिटी फ्लायओव्हरवरून जवळपास 300 किमी वेगाने गाडी चालवत होता. सीसीबीने या राइडरचे शोध घेऊन यमाहा 1000 सीसी बाईक जप्त केली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी युवकाला अटक केले आहे. त्याचे नाव मुनियाप्पा असल्याचे सांगितले जात आहे. हा युवक 10 किमी लांब इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवरून ताशी 300 किमी वेगाने गाडी चालवत होता व इतर गाड्यांना देखील ओव्हरटेक करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पोलिसांनुसार, शहरात एक आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली.