मराठा क्रांती मोर्चाचा उद्या पुन्हा यल्गार


औरंगाबाद – आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली असून सरकारकडून मराठा क्रांती मोर्चा आंदोलना दरम्यान जीव गमावलेल्या तरूणांना कोणतीही आर्थिक मदत झालेली नाही. म्हणून उद्या (23 जुलै) कायगाव टोका याठिकाणी आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने जलसमाधी घेतली होती. त्याच ठिकाणी उद्या आंदोलन करणार करण्यात येणार आहे. तसेच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 कुटुंबातील व्यक्ती देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. दहा दिवसांआधीच मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पण या मराठा तरूणांसाठी सरकारने कोणतीच आर्थिक मदत जाहीर केली नसल्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे रमेश केरे पाटील यांनी यावेळेस सांगितले. दरम्यान, कायगाव टोका याठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे औरंगाबाद पोलिसांकडून तयारी करण्यात येत आहे. सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.