तुमचे दूतावास बंद करा आणि चालते व्हा; अमेरिकेचे चीनला फर्मान


वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीनमधील संबंध कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून कमालीचे ताणले गेले असून त्यातच वांरवार जाहीर सभांमधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान दोन्ही देशातील बिघडत चाललेल्या संबंधांना आणखी एक धक्का लागला आहे. ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान अमेरिकेने चीनला सोडले आहे. बुधवारी याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

दिवसेंदिवस अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात तणाव वाढत चालला आहे. ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश चीनविरोधात टीका करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने थेट चीनला दिले आहेत. याविषयी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन म्हणाले, चीनला मंगळवारी ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी माहिती देण्यात आली. दरम्यान चीनकडून अमेरिकेने हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह करण्यात आला आहे. अन्यथा या निर्णयाविरोधात चीनही आवश्यक व योग्य पावले उचलेले,असा इशारा अमेरिकेला चीनने दिला आहे.

एकतर्फी आणि चिथावणीखोर पाऊल अमेरिकेकडून टाकले जात आहे. जे की एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करणारे आहे. हे चुकीचे पाऊले असून, यामुळे दोन्ही देशातील संबंध खराब होतील. अमेरिकेच्या निर्णयावर चीनकडून टीका करण्यात आल्याचे वांग वेन्बिन म्हणाले.

चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे अमेरिकेने आदेश दिल्याच्या काही वेळानंतर दूतावासात कागदपत्रे जाळण्यात आली. केपीआरसी या स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भातील एक व्हिडीओ जारी केला होता. यात दूतावास परिसरात अंधारात कागदपत्रे जाळण्यात आल्याचे दिसत असल्यामुळे धूर झाला होता. त्यानंतर पाणी टाकून ते विझवण्यात आले. या वृत्ताला स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाने दूजोरा दिला आहे. दूतावासात पोलीस आणि अग्निशमन विभागाला प्रवेश देण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.