चीनने सर्वात प्रथम लस विकसित केली तर आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन – अमेरिकेकडून वारंवार कोरोनाचा फैलाव होण्यासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनने कोरोनाची माहिती लपवली असून हा ‘कोरोना व्हायरस’ नसून ‘चायना व्हायरस’ असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यामुळे सध्या अमेरिका आणि चीनमध्ये खूप तणाव आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना चीनने सर्वात प्रथम लस विकसित केल्यास अमेरिका त्यांच्यासोबत काम करणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला असता आपण कोणासोबतही काम करण्यास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसंबंधी प्रश्न विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कोरोनाची लस विकसित करुन चांगला निकाल देणाऱ्या कोणासोबतही आपण काम करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका कोरोनावरील उपचार आणि लस विकसित कऱण्यामध्ये चांगली प्रगती करत असल्याची माहिती दिली.

दरम्यान कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिकट होईल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. त्यांनी हे वक्तव्य व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. “आपल्या देशातील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. पण काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणे जास्त दुर्दैवी असल्याचे यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. कोरोनाचे रुग्ण दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये वाढत असून तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचा कहर अमेरिकेत कायम असून अमेरिकेतील १ लाख ४१ हजार नागरिकांनी आतापर्यंत आपला जीव गमवाला आहे. यावेळी देशवासियांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असे आम्ही प्रत्येकाला सांगत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, पण मास्क वापरावाच लागेल. मास्क घातल्याने फरक पडतो. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावे लागणार आहे. आपले कोरोनावर नियंत्रण मिळवणे नाही तर त्याला संपवणे हेच ध्येय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. कोरोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून कोरोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला.